चांदसैली घाटाचा रक्षक ‘देवसिंग’
शाळा सुटल्यानंतर रस्त्यावर मागतो आर्थिक मदत, पण स्वतःसाठी नाही तर. चांदसैली घाटातील खड्ड्यांसाठी चिमुकल्या देवसिंगची धडपड...

अक्राणी : एका बाजूला शासन रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा दावा करते, तर दुसऱ्या बाजूला नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटातील जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी एका 7 वीतील आदिवासी विद्यार्थ्याला आर्थिक मदत मागावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवसिंग पावरा नावाचा हा चिमुकला, शाळा सुटल्यावर याच घाटात प्रवाशांकडून मदत गोळा करून खड्डे बुजवतो आहे. त्याच्या या धडपडीमुळे शासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जीवघेणे खड्डे, वाढते अपघात
सातपुड्याच्या दुर्गम भागातून जिल्ह्याला जोडणारा चांदसैली घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. या घाटातील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे अनेक अपघात झाले असून, अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हा रस्ता अनेक आदिवासी पाड्यांना जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणांशी जोडतो, त्यामुळे यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
देवसिंगची अनोखी शक्कल
याच घाटातून रोज शाळेत ये-जा करणारा देवसिंग पावरा, या रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे होणारे अपघात जवळून पाहतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कोणाचाही जीव जाऊ नये या तळमळीतून त्याने एक अनोखी शक्कल लढवली. शाळा सुटल्यावर तो थेट घाटात जातो. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना हात जोडून तो खड्डे बुजवण्यासाठी मदत मागतो.
प्रवाशांनी दिलेल्या पैशांतून तो माती आणि दगड विकत घेतो आणि फावडे व टोपलीच्या मदतीने स्वतः खड्ड्यांमध्ये भरतो. देवसिंगच्या या प्रयत्नांना प्रवाशांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच्या या कार्यामुळे रस्त्यावरील खड्डे काही प्रमाणात कमी झाले असून, अपघातांचे प्रमाणही घटले आहे.
शासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह
एका लहान मुलाला रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा लागतो ही बाब प्रशासनासाठी लाजिरवाणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून घाटाची दुरवस्था झालेली असतानाही प्रशासनाने याकडे का दुर्लक्ष केले, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.
एकीकडे शासनाने कोट्यवधी रुपयांचे रस्ते बांधल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे चांदसैली घाटातील परिस्थिती शासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. देवसिंग पावराची ही धडपड केवळ खड्डे बुजवण्यापुरती मर्यादित नसून, ती शासनाला त्यांची जबाबदारीची आठवण करून देणारी एक हृदयस्पर्शी कथा आहे. त्याच्या या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माझ्या अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातील जनतेला सांगू इच्छितो नंदुरबार जिल्ह्याला धडगाव तालुक्याशी कमीत कमी अंतरात जोडणाऱ्या चांदसैली घाटाच्या विकासासाठी नुकतीच माननीय राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मी राज्यपालांना धडगाव तालुका दत्तक घेण्याबाबत निवेदन सादर केले. त्याचबरोबर, या घाटात सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीसाठी दोन बोगदे तयार करण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. माझा विश्वास आहे की, राज्यपालांच्या सहकार्याने लवकरच या घाटाचा कायापालट होईल, ज्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि विकासाला चालना मिळेल.
आमदार आमश्या पाडवी , अक्कलकुवा अक्राणी विधानसभा, शिवसेना शिंदे गट