जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…
कार्यक्रम नियोजनासाठी आढावा बैठक संपन्न...

अक्राणी : 9 ऑगस्ट रोजी येणाऱ्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, मॅरेथॉन स्पर्धा, सांस्कृतिक रॅली आणि प्रबोधन सभेचा समावेश आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आदिवासी संस्कृतीचा गौरव करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
4 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी या शिबिरामध्ये 250 रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. यावर्षी ही संख्या 300 च्या पुढे जाईल, अशी अपेक्षा आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या शिबिराला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘रन फॉर आदिवासी’ मॅरेथॉन स्पर्धेचे यंदा पहिले वर्ष
जागतिक आदिवासी दिनानिमित्त ‘रन फॉर आदिवासी’ या घोषवाक्यासह यंदा पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मुलांचे दोन गट आणि मुलींचे दोन गट असे एकूण चार गट आहेत. प्रत्येक गटातील विजेत्यांना स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत. यंदा या स्पर्धेची कमाल मर्यादा 5 किलोमीटर ठेवण्यात आली आहे. पुढील वर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल
आदिवासी सांस्कृतिक रॅली आणि प्रबोधन सभा
9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व आदिवासी बंधू-भगिनींना आपल्या पारंपरिक वेशभूषेत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे तोरणामधील प्रसिद्ध ‘पावी नृत्य’ असणार आहे. यासोबतच गुजरातचे आदिवासी पारंपरिक नृत्य पथकही रॅलीमध्ये सहभागी होणार आहे.
रॅली संपल्यानंतर दरवर्षीप्रमाणे प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये आदिवासी संस्कृतीवर आधारित पारंपारिक नृत्यांचे सादरीकरण होईल, तसेच काही पथनाट्येही सादर केली जातील. सर्वांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून आदिवासी दिनाचा उत्साह द्विगुणीत करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.