सुलतानपूरमध्ये आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते वॉटर फिल्टर प्लँटचे उद्घाटन..
रहिवासी विनोद भास्कर पाटील यांनी स्वतःच्या खर्चातून उभारला वॉटर फिल्टर प्लँट..

राधेश्याम कुलथे,शहादा
बातमी लाईव्ह न्यूज | 06 ऑगस्ट 2025 | शहादा तालुक्यातील सुलतानपूर गावात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आणि नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने एका नव्या वॉटर फिल्टर प्लँटची स्थापना करण्यात आली आहे. या प्लँटचे उद्घाटन शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
हा वॉटर फिल्टर प्लँट सुलतानपूर येथील रहिवासी विनोद भास्कर पाटील यांनी स्वतःच्या खर्चातून उभारला आहे. गावात स्वच्छ पाण्याची सोय व्हावी ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला. या प्लँटमुळे आता गावातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शशिकांत वाणी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील चव्हाण, आणि डॉ. विजय चौधरी उपस्थित होते. आमदार राजेश पाडवी यांनी फित कापून या प्लँटचे औपचारिक उद्घाटन केले.
यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी विनोद पाटील यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “स्वच्छ पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. विनोद पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा प्लँट उभारल्यामुळे गावातील नागरिकांची मोठी सोय झाली आहे.”
या कार्यक्रमाला गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये डॉ. किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानूदास पाटील, म्हसावद मंडळ अध्यक्ष विश्वास ठाकरे, योगेश पाटील, निलेश मतकर, देवा महाजन, मनेश पवार, आंतु पाटील, मोहन आवासे, सुकलाल रावताळे, आणि नवनाथ वाघ यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष वाघ यांनी केले.