दुर्गम भागातील गर्भवती महिलांसाठी सोनोग्राफी सेवा….
आता पर्यंत 800 हून अधिक आदिवासी मातांना लाभ...

बातमी लाईव्ह न्यूज |3 ऑगस्ट 2025 | नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागांमधील गर्भवती महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि यशस्वी उपक्रम राबवला जात आहे. मोलगी, अक्कलकुवा आणि धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये आता दर रविवारी सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. जिल्ह्यातील खाजगी रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांनी पुढाकार घेऊन ही सेवा देण्यास सुरुवात केल्यापासून 800 हून अधिक गर्भवती आदिवासी मातांनी याचा लाभ घेतला आहे, ज्यामुळे त्यांना सोनोग्राफीसाठी लांबचा प्रवास करून जिल्हा रुग्णालय गाठण्याची गरज राहिलेली नाही.
तालुका स्तरावर सोनोग्राफीची उपलब्धता
यापूर्वी, दुर्गम भागातील गर्भवती महिलांना पहिल्या सोनोग्राफीसाठी थेट नंदुरबार जिल्हा रुग्णालय गाठावे लागत होते, ज्यामुळे त्यांना मोठा त्रास आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत होता. अनेक वर्षांपासून धडगाव ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीसाठी लॅब उपलब्ध असूनही डॉक्टरांची उपलब्धता नसल्याने ही समस्या भेडसावत होती. मात्र, आता तालुका स्तरावरच सोनोग्राफी उपलब्ध झाल्याने गर्भवती मातांची फरफट थांबली आहे. आणि त्यांचे हाल थांबले आहेत..
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या प्रयत्नांना यश
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे.जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी जिल्ह्यातील खाजगी रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांशी संवाद साधून या समस्येवर उपाय शोधला. जिल्ह्यातील चारही रेडिओलॉजिस्ट डॉक्टरांनी दुर्गम भागात सेवा देण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे आपल्या आदिवासी महिलांना मोठा आधार मिळाला आहे. जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या सार्थक चर्चेनंतरच दुर्गम भागातील समस्या त्वरित सोडण्यास मदत झाली असल्याचे डॉ. परमार यांनी सांगितले.
डॉ संतोष परमार ,वैद्यकीय अधिकारी
या सेवेमुळे गर्भवती महिलांना वेळेत आरोग्य सेवा मिळण्यास मदत होत असून, त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेणे शक्य झाले आहे. दुर्गम भागातील गर्भवती महिलांना आता धडगाव ग्रामीण रुग्णालयातच सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध झाली असेल त्यांना सोनोग्राफी दरम्यान जेवणाची देखील व्यवस्था प्रशासनाचा मार्फत करण्यात येत आहे…
डॉ.कांतीलाल पावरा , तालुका वैद्यकीय अधिकारी अक्राणी..