नंदुरबार आयटीआयमध्ये अभाविपचे ठिय्या आंदोलन..
परीक्षा केंद्र जिल्हास्तरावर देण्याची मागणी...

बातमी लाईव्ह न्यूज ! नंदुरबार शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले.
नंदुरबार हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही आयटीआयचे परीक्षा केंद्र 42 कि.मी. दूर अक्कलकुवा येथे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागते. जून महिन्यातील पावसामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्यास विलंब होतो, परिणामी त्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही. यासह वसतिगृहातील अस्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव आणि खराब रस्ते यांमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
आंदोलनाची दखल घेत प्राचार्यांनी अभाविपच्या 11 मागण्या मान्य केल्या असून, त्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या आंदोलनात शहर मंत्री महेश नांद्रे, महाविद्यालयाध्यक्ष रोहित भोई, रोहित माळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते.




