नंदुरबारमध्ये पोलिसांकडून मिरवणुकांवर ड्रोनने करडी नजर

बातमी लाईव्ह न्यूज | नंदुरबार | ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकांवर करडी नजर ठेवण्यासाठी नंदुरबार पोलिसांनी आधुनिक ड्रोनचा वापर केला. इंटेलिजन्ससाठी वापरल्या जाणाऱ्या ‘क्यू सिक्स’ (Q6) या जंबो ड्रोनद्वारे दोन्ही मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यात आले.
हा ड्रोन पाच किलोपेक्षा कमी वजनाचा असून, त्याची रेंज जवळपास ७ ते १० किलोमीटर आहे. त्याची किंमत सुमारे ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या ड्रोनची बॅटरी क्षमता एक तास असून, त्याचा कॅमेरा उच्च दर्जाचा आहे. त्यात नाइट व्हिजन (Night Vision) सुविधा असल्याने रात्रीच्या वेळीही स्पष्ट चित्रीकरण करता येते. यामुळे दोन्ही मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणे पोलिसांना सोपे झाले.
हा ड्रोन विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा प्रात्यक्षिक म्हणून दोन्ही मिरवणुकांमध्ये वापर केला. आता या ड्रोनच्या खरेदीचा प्रस्ताव पोलीस दलाने शासनाकडे पाठवला आहे.
पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. हा ड्रोन पोलिसांसाठी खूप उपयुक्त ठरला आहे आणि त्याच्या खरेदीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.




