ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप: माजी मंत्री पद्माकर वळवी राष्ट्रवादीच्या वाटेवर?

Political earthquake in Nandurbar: Former minister Padmakar Valvi on the path of NCP?


राहुल शिवदे,तळोदा

बातमी लाईव्ह न्यूज | 13 ऑगस्ट 2025 | नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. माजी क्रीडा मंत्री आणि आदिवासी समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले ॲड. पद्माकर वळवी हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांची भेट आणि राजकीय चर्चांना उधाण

पद्माकर वळवी यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे यांच्यासोबत मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.

वळवी यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास

काँग्रेस सरकारमध्ये क्रीडा मंत्रीपद भूषवलेले पद्माकर वळवी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांना भाजपमधून उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी भाजपला रामराम ठोकून विधानसभा निवडणुकीत आदिवासी पार्टीकडून निवडणूक लढवली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, आता येणाऱ्या निवडणुकीत ते कोणत्या पक्षातून लढणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

येत्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसला धक्का?

ॲड. पद्माकर वळवी यांचा नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात मोठा प्रभाव आहे. त्यामुळे, जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर त्याचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

आता पद्माकर वळवी यांचा अधिकृत प्रवेश कधी होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्यांच्या या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्याचं राजकीय समीकरण बदलणार का, हे येणारा काळच ठरवेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button