तळोदा येथे बिबट्याचा मानवावर पुन्हा हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Leopard attacks human again in Taloda; fear spreads among citizens

राहुल शिवदे,तळोदा
बातमी लाईव्ह न्यूज |10 ऑगस्ट 2025 | तळोदा शहरालगतच्या काजीपूर शिवारात बिबट्याने एका 70 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले असून, वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काजीपूर शिवारात सुनील नत्थु माळी यांच्या शेतात काम करणाऱ्या बावीबाई चांद्या वळवी (वय 70) या सायंकाळी वाजण्याच्या सुमारास मक्याच्या शेतातून रस्त्याकडे येत होत्या. त्यावेळी जवळच्या झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या पायावर हल्ला केला. बिबट्या त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आरडाओरड केली. महिलेचा आवाज ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी बिबट्यास हाकलून लावल्याने तो पळून गेला. मात्र, या हल्ल्यात महिलेच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी बावीबाई यांना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे. अनेक महिन्यांच्या शांततेनंतर बिबट्याने पुन्हा मानवावर हल्ला केल्याने काजीपूर रस्त्यावर सकाळी-सायंकाळी फिरणाऱ्या पादचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
वन विभागाच्या परिविक्षाधीन वन क्षेत्रपाल मनीषा कदम, वनपाल गिरीधर पावरा आणि वनपाल आशुतोष पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असले तरी, या नरभक्षक बिबट्याचा ठोस बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.